अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीका-टिपण्णीवर देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलं आहे.
मुंबईः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियावर व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सक्रिय असतात. अनेकदा त्यांनी राज्यातील राजकारणावरही भाष्य केलं आहे. अमृता फडणवीस यांच्या या भूमिकेवरुन अनेकदा त्यांच्यावर टीकाही झाली आहे. या सर्वांवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सामनाला मुलाखत देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेलं तर त्यांनाही कुटुंब आहेत, असा इशारा दिला होता. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना नेत्यांवर निशाणा साधत उत्तर दिलं आहे.
घरच्यांच्या संदर्भात जो काही विषय मांडला जातोय, त्याबद्दल बोलायचं झाल्यास आम्ही कोणाच्याही घरच्यांवर हल्ला करत नाही. आम्ही कधीच घरच्यांवर टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. घरच्यांवरील टीकेबाबत बोलायचं झालं कर याचं सर्वात मोठं उदाहरण मी स्वतः आहे. माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय लिहतात, काय बोलतात हे सगळ्यांनाच माहितीये. पण मी त्याचा कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर देईन, असा पलटवार त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेनं भाजपसोबत युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. शिवसेनेच्या या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं. राज्यात झालेल्या या सत्ताबदलावर अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर ही आरे मेट्रो कारशेड, कंगना राणावर प्रकरण, अर्णब गोस्वामी यांची अटक या प्रकरणावर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. शिवसेने नेत्यांनीही अमृता फडणवीसांच्या टीकेवर वेळोवेळी सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. तसंच, अमृता यांच्या गाण्यांवरुनही त्यांना नेहमी ट्रोल केलं जातं, या सगळ्या घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.