More
    HomePoliticsगिरीश महाजनांवर पारस ललवाणी यांचे गंभीर आरोप; पुराव्यादाखल सीडी, पेन ड्राईव्ह असल्याचा...

    गिरीश महाजनांवर पारस ललवाणी यांचे गंभीर आरोप; पुराव्यादाखल सीडी, पेन ड्राईव्ह असल्याचा दावा

    जळगाव : भाजपा नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह काही जणांविरोधात अॅड विजय पाटील यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांच्यावर विविध आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. गिरीश महाजन यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बीएचआर पतसंस्थेच्या जमिनी अतिशय कमी दरात खरेदी केल्या. तसंच पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करण्याचा पॅटर्न गिरीश महाजन यांनी राज्यभरात पसरवला आहे, असा आरोप ललवाणी यांनी केला आहे. आपल्याकडे पुराव्या दाखल सीडी आणि पेन ड्राईव्ह असून योग्य वेळ आल्यास ते उघड करु असंही ते म्हणाले.

    अॅड विजय पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आपली संस्था बळकावण्याचा गिरीश महाजन यांचा डाव असल्याचा आरोप केला होता. शिवाय सत्तेत असताना पोलीस यंत्रणेचा वापर करत त्यांनी आपल्यासह अनेक जणांवर विविध आरोप देखील केले होते, असा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी रविवारी (20 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांच्यावर विविध आरोप केले.

    यावेळी बोलताना पारस ललवाणी यांनी म्हटलं की, “बीएचआर पतसंस्थेच्या जमिनी गिरीश महाजन यांनी अतिशय कमी दरात आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खरेदी केल्या आहेत. यासोबतच अनेक संस्था बळकावण्यासाठी संबंधित संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर त्यांनी पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना त्रास दिला. पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करण्याचा पॅटर्न गिरीश महाजन यांनी राज्यभरात पसरवला आहे. विरोधी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना जेरीस आणण्याचं काम महाजन यांनी करुन कार्यकर्त्यांना भाजपमध्ये येण्यासाठी भाग पाडलं.” जामनेर पालिकेत 41 टक्के जास्तीचे टेंडर भरुन त्यांनी जनतेची फसवणूक केल्याचा प्रकार साधना महाजन यांच्या काळात सुरु असल्याचं पारस ललवाणी यांनी म्हटलं आहे

    अॅड विजय पाटील यांनीही गिरीश महाजन यांच्याविरोधात पुराव्याची सीडी आपल्याकडे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पारस ललवाणी यांनीही आपल्याकडे ही पुरावे असलेली सीडी आणि पेन ड्राईव्ह आहे. गिरीश महाजन यांच्याकडून काही त्रास झाल्यास आपण ही सीडी जाहीर करु असं ते म्हणाले. मात्र या सीडीमध्ये नक्की काय आहे आणि कोणाविरोधात पुरावे आहेत याबाबत अधिक बोलणं टाळत पुढील काळात सर्व सत्य समोर येईल असं ते म्हणाले.

    अॅड विजय पाटील आणि पारस ललवाणी यांच्याकडे असलेल्या सीडीमध्ये नक्की काय आहे, कोणाविरोधात पुरावे आहेत आणि ते कधी उघड होणार याचीच चर्चा आता राजकीय गोटात होत आहे.

    दरम्यान ललवाणी यांच्या या आरोपांवर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img