MLC election Maharashtra 2020 result LIVE: मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Graduate Constituency Election result) पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. भाजपने पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा गमावली आहे. शिवाय औरंगाबादमध्येही राष्ट्रवादीने बाजी मारली. तर शिक्षक मतदारसंघात पुण्याची जागा काँग्रेसने तर अमरावतीची जागा अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी जिंकली. केवळ धुळे-नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अमरिश पटेल यांनी बाजी मारली.
या सर्व मतदारसंघांसाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं होतं. कालपासून या निवडणुकांची मतमोजणी होत असून धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला.
ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही – फडणवीस
विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला, चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली, विश्लेषण करायचं झालं तर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली. स्ट्रॅटेजी चूक झाली असेल तर तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याचं आकलन चुकलं. आता आम्हाला कळलं त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू. ही निवडणूक अचानक लागली, त्यामुळे अनेक रजिस्ट्रेशन राहिलं. आम्ही रजिस्ट्रेशनमध्ये कमी पडलो. माझ्या घरी, गडकरींच्या घरची चार नावं नाहीत.. आता ही गोष्ट बाजूला, जे जिंकले त्यांना शुभेच्छा.. एक गोष्ट नमूद करावी, ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही. दोन पक्षांना फायदा झाला, जसं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, तसं ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा येत नाही त्यांनीही आत्मचिंतन करावं – देवेंद्र फडणवीस