दिवाळीनंतर तीन आठवड्यांत रुग्णवाढीचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ही वाढ झाली नाही, तर १५ डिसेंबरनंतर लोकल व शाळा सुरू करण्याचा विचार आहे’, अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.

‘मुंबईत करोना पूर्ण नियंत्रणात आहे. दिवाळीनंतर तीन आठवड्यांत रुग्णवाढीचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ही वाढ झाली नाही, तर १५ डिसेंबरनंतर लोकल व शाळा सुरू करण्याचा विचार आहे’, अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.
गणेशोत्सवात पुन्हा वाढलेला करोनाचा संसर्ग ऑक्टोबरपर्यंत पूर्ण नियंत्रणात आला होता. मात्र दिवाळीत नागरिकांच्या वाढलेल्या भेटीगाठी व बाजारात झालेल्या गर्दीमुळे साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे करोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर दररोज दोन ते अडीच हजारांपर्यंत रुग्ण वाढत होते. त्या तुलनेत दिवाळीनंतरच्या पहिल्या आठवड्यात दररोज फक्त ४०० ते ५०० रुग्ण वाढत आहेत. दिवाळीनंतर रुग्णवाढीच्या शक्यतेने पालिकेने तपासण्या, चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. त्यामुळे फार मोठी रुग्णवाढ होणार नसल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मे आणि जूनमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी रुग्णसंख्या ४० हजारांहून अधिक झाली होती. गणेशोत्सवानंतर ही संख्या २० हजारांपर्यंत पोहोचली होती. त्या तुलनेत दिवाळीनंतरच्या पहिल्या आठवड्यातील फार मोठी वाढ नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ‘सध्या दररोजची रुग्णसंख्या ९०० ते १०००पर्यंत असून, विविध रुग्णालयांत सुमारे ९६०० रुग्ण उपचार घेत आहेत. दिवाळीनंतर रुग्णवाढीचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना वाढवल्या. त्यामुळे संसर्गाचा वेग रोखता आला आहे’, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली आहे. ‘नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून सुरक्षित अंतर, मास्क लावावा. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये. ही काळजी घेतली नाही, तर संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन टाळणे हे पूर्णपणे आपल्या हाती आहे’, असे आयुक्त म्हणाले.
‘पालिका तोंड देण्यास सज्ज’
‘पुन्हा रुग्णवाढ झाली तरी पालिकेची आरोग्य यंत्रणा तोंड देण्यास भक्कमपणे उभी आहे. साडेबारा हजार खाटा सध्या रिक्त आहेत. त्यात अतिदक्षता विभागात एक हजार खाटा उपलब्ध आहेत. जम्बो सुविधा असलेली नऊ करोना केंद्रे व रुग्णालये अद्याप बंद केलेली नाहीत. आवश्यकता वाटेल तेव्हा ही केंद्रे पुन्हा सुरू करता येतील. खबरदारी म्हणून बुधवारपासून विमानतळ, रेल्वे स्थानके यासह जिथून बाहेरगावावरून येणारे प्रवासी आढळतील, त्यांची करोना चाचणी अहवाल किंवा नवीन चाचणी सक्तीची केली आहे. त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसू लागेल. बुधवारी सर्व ठिकाणी सुरू केलेल्या तपासणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे’, अशी माहितीही आयुक्तांनी दिली