देशात पुन्हा करोना बाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली असून राज्यातही करोना रुग्णांची वाढ होत आहे.

मुंबईः राज्यात नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी राज्यात ६ हजार ४०६ नव्या रुग्णांचे निदान झाले. यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १८ लाख ०२ हजार ३६५ इतकी झाली आहे. राज्यात आज ८५ हजार ९६३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

करोना विषाणू पुन्हा आपला विळखा घट्ट करु लागला आहे. दिवाळीपूर्वी रोडावत गेलेल्या रुग्णसंख्येनं गेल्या काही दिवसांपासून पुन्हा डोकं वर काढलं आहे. ऑक्टोबर महिन्यात बाधित्यांच्या संख्येत घट होत होती. त्यामुळं प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या प्रयत्नाना यश येत असल्याचं चित्र होते. परंतु, दिवाळी संपत नाही तोच पुन्हा करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. आज आरोग्य प्रशासनाने जारी केलेल्या आकडीवारीनुसार राज्यात सहा हजार ४०६ बाधित रुग्ण सापडल्यानं एकूण रुग्णांच्या संख्येनं १८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
”ते’ राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख?’
दिवाळीआधी करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा अधिक होता. आज मात्र हे चित्र उलटे फिरले आहे. आज ४,८१५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण १६,६८,५३८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेटही ९२. ५७ टक्के इतका झाला आहे. राज्यात करोना रुग्णांचे सत्र वाढत असताना करोना मृतांचा आकडा मात्र गेल्या दोन दिवसांपासून स्थिर आहे. आजही राज्यात ६५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण करोना रुग्णांची संख्या ४६ हजार ८१३ इतकी झाली असून मृत्यूदर २. ६ टक्के इतका झाला आहे.