More
  HomePoliticsपत्नीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजप खासदाराचा संताप, घटस्फोटाची नोटीस

  पत्नीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजप खासदाराचा संताप, घटस्फोटाची नोटीस

  कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत राजकीय लढाईने आता कौटुंबिक लढाईचं रुप घेतलं आहे. भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल खान यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गृहकलह सुरु झाला आहे. पत्नी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर खासदार सौमित्र खान यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी पत्नी सुजाता यांना घटस्फोटाची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

  सुजाता मंडल यांनी कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पक्षप्रवेश केला. सुजाता मंडल म्हणाल्या की, “कुटुंब आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता पुढे काय करायचं आहे याचा निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल.”

  सौमित्र खान हे बिश्नुपूर मतदारसंघाचे खासदार आहेत. सोबत ते भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षही आहेत. पत्नी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्याने सौमित्र खान यांचा संताप अनावर झाला आहे. खासदार सौमित्र खान यांनी थेट नातं संपवण्याचं म्हटलं आहे. राजकारणामुळे दहा वर्षांचं नातं संपलं आहे. सौमित्र खान यांनी सुजाता यांना घटस्फोटाची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटाची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेताना सुजाता खान यांची कार आणि बरजोरामधील घराची सुरक्षा काढून घेतली आहे.

  सौमित्र खान यांनी तृणमूल काँग्रेसवर गो तस्करी, कोळसा चोरीच्या आरोपांनंतर पत्नीच्या चोरीचा आरोप केला आहे. “तृणमूल संसार मोडत आहे, आता त्यांना सडेतोड उत्तर देण्याची वेळ आलीय,” असंही ते म्हणाले. सोबतच त्यांनी सुजाता यांना नावापुढे ‘खान’ आडनाव न लावता केवळ सुजाता ‘मंडल’ एवढंच लिहावं, असं म्हटलं आहे.

  भाजपमध्ये मला मानसन्मान नव्हता : सुजाता मंडल
  टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर सुजाता खान म्हणाल्या की, “भाजप लोकांचा सन्मान आणि आदर करत नाही. इथे केवळ संधीसाधू आणि भ्रष्ट लोकांचाच बोलबाला आहे. भाजपमध्ये मला मानसन्मान नव्हता. मी पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली होती पण आता भाजपमध्ये मला कोणताही मान राहिलेला नाही. महिला म्हणून पक्षात राहणं माझ्यासाठी कठीण बनलं होतं.”

  लोकसभा निवडणुकीत सुजाता यांनी पतीचा प्रचार केला होता!
  2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एका कोर्ट खटल्यामुळे सौमित्र खान यांना त्यांच्या मतदारसंघात जाण्यासाठी बंदी घातली होती. तेव्हा सुजाता यांनी आपल्या पतीसाठी निवडणुकीचा प्रचार केला होता.सुजाता खान म्हणाल्या की, “एक दिवस त्यांना नक्कीच जाणीव होईल आणि काय सांगावं की एक दिवस तेच टीएमसीमध्ये परत येतील.”

  मागील वर्षी सौमित्र खान यांचा भाजपमध्ये प्रवेश
  सौमित्र खान मागील लोकसभा निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये सामील झाले होते. ते मुकुल रॉय यांचे निकटवर्ती समजले जातात. मुकुल रॉय आधीच भाजपमध्ये सामील झाले होते.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img