More
    HomeNationalMaharashtraपुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर सुखरुप, पुणे पोलिसांनी जयपूर येथून घेतलं ताब्यात

    पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर सुखरुप, पुणे पोलिसांनी जयपूर येथून घेतलं ताब्यात

    दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी गौतम पाषाणकर यांना जयपूर येथून ताब्यात घेतले आहे. जयपूर येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्यांना सुखरूप ताब्यात घेतलं आहे.

    पुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर यांचा अखेर पोलिसांनी शोध घेतला आहे. गोतम पाषाणकर आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके त्यांचा तपास करत होती. मात्र मागील महिनाभरापासून त्यांचा तपास लागत नव्हता. परंतु आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी गौतम पाषाणकर यांना जयपूर येथून ताब्यात घेतले आहे. जयपूर येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्यांना सुखरूप ताब्यात घेतलं आहे.

    गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला आणि हे घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिसमधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबियांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली.

    तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसापासून व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी त्यात लिहिलं आहे. यानंतर तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.

    तपासादरम्यान पोलिसांनी पाच ते सहा पथक करून राज्यातील वेगवेगळ्या शहरात त्यांचा शोध घेतला जात होता. काही दिवसांपूर्वी ते कोल्हापूरमध्ये असल्याचेही निष्पन्न झाले होते. परंतु त्यानंतर ते पुन्हा गायब झाले. आज अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना जयपूर येथील एका हॉटेलमधून सुखरूप ताब्यात घेतले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img