महाराष्ट्रात करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे राज्य पुन्हा लॉकडाउनकडे तर जाणार नाही, अशी अनेकांना धास्ती वाटत आहे. राजकीय वर्तुळातून मध्येच अशी शक्यताही व्यक्त होत आहे.महाराष्ट्रात करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे राज्य पुन्हा लॉकडाउनकडे तर जाणार नाही, अशी अनेकांना धास्ती वाटत आहे. राजकीय वर्तुळातून मध्येच अशी शक्यताही व्यक्त होत आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातून अशा लॉकडाउनला विरोध होत आहे. केवळ धास्तीने लॉकडाउन करणे योग्य नाही, हा अंतिम टप्प्यातील उपाय आहे, असे ठाम मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. करोना रुग्णांची हळुहळू वाढत असलेली संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्याच्या उपायांवर भर द्यायला हवा. लॉकडाउन करून हा प्रश्न सुटणार नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे.

पुन्हा लॉकडाउन नकोच!

राज्य सरकारनेच नियुक्त केलेल्या टास्क फोर्स समितीमधील सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी लॉकडाउन हा करोना संसर्ग नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेतील अंतिम उपाय असल्याचे सांगितले. ‘नागरिकांचे जीव वाचवण्याची वेळ येते, तेव्हा या पर्यायाचा विचार करावा लागतो. लॉकडाउन केल्यामुळे आरोग्य यंत्रणेला पूर्वतयारी करण्यासाठी वेळ मिळतो. पण त्यामुळे संसर्गाच्या सर्व शक्यता संपत नाहीत’, याकडे डॉ. जोशी यांनी लक्ष वेधले. राज्य सरकारने स्थापन केलेल्या मृत्यू दर समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनीही लॉकडाउनबाबत हेच मत व्यक्त केले. ‘दिवाळीनंतर वाढलेल्या संसर्गाचे प्रमाण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लक्षात येईल. गर्दीच्या ठिकाणी वावर कमी करणे, सार्वजनिक सुरक्षेसाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हे अधिक गरजेचे आहे’, असे डॉ. सुपे म्हणाले.

‘लस केव्हा येईल यासंदर्भात निश्चितपणे सांगता येत नाही, त्यामुळे औषधांच्या संदर्भातही गांभीर्याने विचार व्हायला हवा. स्वाइन फ्लूचा आजार बळावत असताना औषधांमुळे रुग्णांना लवकर दिलासा मिळाला. सामान्यांनी जर संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन केले, तर करोनाला दूर ठेवणे शक्य आहे’, अशी भूमिका ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी मांडली. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी राज्यातील संसर्गप्रवण भाग कोणते, तेथील रुग्णसंख्यावाढीची गती याकडे लक्ष देऊन प्रतिबंधात्मक क्षेत्राचे निकष लावायला हवेत. रुग्णसंख्या वाढत असलेल्या ठिकाणी रुग्णसंख्या नियंत्रित करण्यावर अधिक भर द्यायला हवा, असे तज्ज्ञ सुचवतात. अतिदक्षता विभागतज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी वेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. ‘सर्वांनी जर मास्क योग्यरितीने लावले, सुरक्षित अंतरांचे निकष काटेकोर पाळले तर लॉकडाउन करण्याची वेळच येणार नाही. संसर्ग रोखणे, मृत्यूदर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सर्वांमध्ये आरोग्यसाक्षरता रुजवण्याची गरज आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज प्रतिपादित केली. जोपर्यंत चाचण्यांची संख्या वाढत नाही, तोपर्यंत एकूण लोकसंख्येपैकी किती जणांना संसर्ग झाला, हे लक्षात येत नाही. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वैद्यकीय नियमांचे पालन एकाच पद्धतीने केले जात नाही. त्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता बळावली आहे. ही लढाई दीर्घकाळ चालणारी आहे ही तयारी ठेवूनच करोनाशी मुकाबला करायला हवा, असे सांगितले जात आहे. संसर्गप्रसारक गटामध्ये किती जण आहेत, हे रुग्णांच्या निकटच्यांचा शोध घेतल्यानंतरच समोर येईल. त्यामुळे लॉकडाउनपेक्षा चाचण्यांची संख्या वाढवण्यावर अधिक भर द्यायला हवा, याकडे हे अधिकारी लक्ष वेधतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here