मुंबईः “भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे”, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. मुंबईत जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना राष्ट्रवादीत मेगाभरती होणार असल्याचे संकेत दिलेत. (More Than 10 MLA Disgruntled In BJP, Mega Recruitment In NCP Soon Says Jayant Patil)
गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत, उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे, लवकर निर्णय घेतला जाईल, असं म्हणत जयंत पाटलांनी एकच खळबळ उडवून दिली.
स्टे दिलेला असला तरी अंतिम सुनावणी बाकी आहे. आरेच्या भागात वन क्षेत्र आहे, त्यात वनविरोधी जे लोक आहेत, त्यांना उकळ्या फुटायची गरज नाही. मुंबईच्या जवळ वन असणे हे मुंबईकरांसाठी भाग्याचे आहे. तिथे प्रकल्प केले तर पर्यावरण हानी होते, सरकारने भूमिका घेतली त्यावर इतकं आकांततांडव करण्याची गरज नाही. राजकीय हितासाठी काही जण राजकारण करत आहेत, असंही जयंत पाटील म्हणाले.
संकट सावरल्यावर टीम येते म्हणजे केंद्राचा राज्यांकडे पाहण्याचा दुजाभाव
तसेच यावेळी त्यांनी केंद्राकडून शेतकऱ्यांना उशिरा मदत मिळत असल्याच्या मुद्द्यावरूनही टीकास्त्र सोडलं. दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टी झाली. केंद्र सरकारकडे आम्ही सतत मागणी केली असून, केंद्रानं पथक पाठवायला हवे. आता संकट सावरल्यावर टीम येते म्हणजे केंद्राचा राज्यांकडे पाहण्याचा दुजाभाव बदलला आहे. संकट आल्यावर पवार साहेब केंद्रीय मंत्री असताना लगेच टीम यायची, राज्याला मदत मिळायची. आज मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते, विशेषतः महाराष्ट्राबाबत दुजाभाव करत आहेत, असंही जयंत पाटलांनी सांगितलं आहे.
Read more –