More
    HomeNationalMaharashtraमोदी सरकार झिरो स्टँडर्ड; महाराष्ट्रात आणीबाणी लागू करून फडणवीसांना सत्तेत यायचेय: राऊत

    मोदी सरकार झिरो स्टँडर्ड; महाराष्ट्रात आणीबाणी लागू करून फडणवीसांना सत्तेत यायचेय: राऊत

    कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या याच पंजाबच्या शेतकऱ्यांनी तुमचे खासदार निवडून तुम्हाला सत्तेत आणले. तेव्हा ते भ्रमात असल्याचे कोणीही म्हटले नाही

    मुंबई: ठाकरे सरकारकडून मराठा आंदोलकांची होणारी गळचेपी म्हणजे आणीबाणीच आहे, असे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समाचार घेतला. भाजपलाच हुकूमशाही आणि आणीबाणी हवी आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात आणीबाणी लागू व्हावी, असे वाटते. तशी परिस्थिती निर्माण करून फडणवीस यांना पुन्हा सत्तेत यायचे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut take a dig at Modi govt over farmers protest)

    संजय राऊत यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले. मोदी सरकार हे ‘झिरो स्टँडर्ड’ आहे. दिल्लीत आंदोलन करत असलेल्या पंजाबी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अर्धे लोक भारतीय लष्करात आहेत. तरीही तुम्ही त्यांचा पाकिस्तानशी संबंध जोडून त्यांना देशद्रोही ठरवता. उद्या तुम्ही विरोधकांनाही देशद्रोही ठरवाल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

    ‘आम्ही इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणी विसरलेलो नाही’

    शिवसेनेला इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणीचा विसर पडलेला नाही. मोदी सरकारकडे बहुमत असले तरी लोकशाही व्यवस्थेत त्यांना विरोधी पक्षांचा आवाज ऐकावाच लागेल. मोदी सरकार हे डबल स्टँडर्ड सोडाच पण झिरो स्टँडर्ड आहे. लोकशाहीमध्ये विरोधी आवाजाला देशद्रोही ठरवणे हीदेखील एकप्रकारची आणीबाणी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

    नितीन गडकरींना राऊतांचे प्रत्युत्तर

    केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी भाष्य केले होते. या कायद्यांविषयी शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. गडकरी यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

    या देशात कोणीही भ्रमात किंवा अंधारात नाही. कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या याच पंजाबच्या शेतकऱ्यांनी तुमचे खासदार निवडून तुम्हाला सत्तेत आणले. तेव्हा ते भ्रमात असल्याचे कोणीही म्हटले नाही. मात्र, आज त्यांनी सरकारविरोधात आवाज उठवला तर ते भ्रमात असल्याचे प्रचार केला जात आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

    नितीन गडकरी काय म्हणाले?

    केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सूचना आणि सल्ल्यांवर विचार करण्यास तयार आहोत. आमच्या सरकारकडून शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांनी पुढे येऊन कृषी कायदे समजून घ्यायला हवेत. काही घटक शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेत त्यांची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत, असा आरोप नितीन गडकरी यांनी केला होता.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img