रोहित शर्मा हा दुखापतीमुळे आयपीएल संपल्यावर मुंबईत आला, असे म्हटले जात होते. पण खरी गोष्ट ही आहे की, रोहितच्या वडिलांना करोना झाला होता आणि त्यांची काळजी घेण्यासाठई रोहित मुंबई आला होता. पण त्यानंतर देशहिताचा विचार करून तो जास्त दिवस घरी न राहता त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : दुखापतीमुळे रोहित शर्मा हा आयपीएलनंतर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर न जाता थेट मुंबईत आला, असे म्हटटले जात होते. पण रोहितचे वडिल करोना पॉझिटीव्ह सापडले होते, त्यामुळेच रोहितने युएईहून मुंबईत आपल्या घरी येण्याचा निर्णय घेतला, ही गोष्ट आता पुढे आली आहे. त्यामुळे वडिलांची काळजी घेण्यासाठीच रोहित मुंबईत आला होता, हे आता समोर आले आहे.

रोहितच्या फिटनेसवरून बरेच राजकारण रंगले, असे चाहते म्हणत होते. पण रोहितला आपल्या त्या काळात आपल्या कुटुंबियांची चिंता जास्त सतावत होती. आपल्या वडिलांना करोना झाला आहे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी रोहितने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता.
याबाबत क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांनी सांगितले की, ” रोहित हा आयपीएल संपल्यावर मुंबई इंडियन्सच्या संघाबरोबर मुंबईत आला होता, कारण त्याचे वडिल करोना पॉझिटीव्ह सापडले होते. त्यामुळे रोहितने मुंबईत येऊन आपल्या वडिलांची काळजी घेतली. रोहित हा त्यानंतरही आपल्या कुटुंबियांबरोबर राहीला असता. देशहिताचा विचार करून त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. रोहितला ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळायची नव्हती, असे नाही. पण रोहितपुढे हे महत्वाचे कारण असल्यामुळेच त्याने मुंबईत वडिलांजवळ येण्याचा निर्णय घेतला.”
भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा आणि जलद गोलंदाज इशांत शर्मा अद्याप फिट नसल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार पैकी पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रथम वनडे आणि मग टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर १७ डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होईल. क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे. या दोन्ही खेळाडूंना वनडे आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देत कसोटी संघात स्थान दिले होते. दुखापतीमुळे हे दोन्ही खेळाडू सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहेत. एनसीएमध्ये वैद्यकीय पथक त्यांच्या फिटनेसवर काम करत आहे