More
    HomeUncategorizedचुकीच्या निकालांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!

    चुकीच्या निकालांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचे निकाल लागल्यावरही विद्यार्थ्यांना सुटकेचा निःश्वास सोडता येत नाही. आपल्या काही विषयांचा निकाल चुकीचा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे.

    पुणे : अडथळ्यांची शर्यत पूर्ण करता करता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पार पडल्या. ऑनलाईन परीक्षा देताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा जीव मेटाकुटीला आला होता. अंतिम वर्षांच्या परीक्षेचे निकाल लागल्यावरही विद्यार्थ्यांना सुटकेचा निःश्वास सोडता येत नाही. आपल्या काही विषयांचा निकाल चुकीचा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे.

    ऑनलाईन पेपर पूर्ण सोडवूनही त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना शून्य मार्क मिळाल्याचं समोर आलं आहे. तर काहींना पेपर देऊनही परीक्षेला गैरहजर असल्याचं दाखवलं जात आहे. काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेपर देताना तांत्रिक अडचण आली आणि नंतर त्यांनी तो पेपर सबमिट केला. पण त्याच पेपरच्या निकालामध्ये आता 100 पैकी 20 ते 22 गुण मिळाल्याचं समोर आलं आहे. बाकीच्या सर्व विषयांमध्ये डिस्टिंक्शन मिळालेलं असताना फक्त एका विषयांत कसं काय एवढे कमी मार्क मिळाले असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.

    विद्यापीठानेही या तक्रारींची दखल घेत त्यांची शहानिशा करत असल्याचं सांगितलं आहे. पण यामध्ये खूप वेळ लागत असल्याने पुढच्या अॅडमिशनचं कसं करायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे.

    अर्थशास्त्राचा विद्यार्थी असलेल्या, निखिल बेलोटेने सांगितलं की, “मला एकाच विषयात 22 मार्क मिळाले आहेत. बाकी सगळ्या विषयांमध्ये मी प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालो आहे. पण या विषयात नापास झाल्याने माझं वर्ष वाया जाते की काय अशी भीती आहे. माझी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये मास्टर्ससाठी निवड झाली आहे. पण तिथे डिसेंबरच्या आधी पासिंग सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे. पण हा प्रश्न सुटत नाही. माझं वर्ष वाया जाईल का अशी भीती वाटते.”

    अशी चिंता एलएलबीची फायनल ईयरची विद्यार्थीनी योगिता शेकडे आणि बीकॉम फायनल ईयरची विद्यार्थीनी भारती मनध्यानी यांनी व्यक्त केली. बाकी विषयांमध्ये उत्तम गुण मिळालेले असूनही फक्त एका विषयाचा पेपरचा निकाल असा चुकीचा लागल्याने मास्टर्ससाठी कशी अॅडमिशन घ्यायची असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.

    यासंदर्भात विद्यापीठाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर आमच्याकडे चुकीचा निकालांच्या संदर्भात आतापर्यंत फक्त 134 तक्रारी आल्या आहेत, असा दावा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आला आहे. या तक्रारींची आम्ही शहानिशा करत आहोत असं विद्यापीठाकडून सांगितलं आहे.

    पण हा प्रश्न फक्त काही विद्यार्थ्यांचा नसून हजारो विद्यार्थ्यांचा असल्याचं विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे. “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत शिकत असलेल्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा आणि निकालाबाबत समस्या येत आहेत. गुगल फॉर्मद्वारे विद्यार्थ्यांच्या अडचणी ‘युवक क्रांती दला’कडे आतापर्यंत 1069 प्राप्त झालेल्या आहेत, तक्रारी वाढतच आहेत. आम्ही तक्रारी घेण्याचे काम थांबवलं आहे. दिवसेंदिवस तक्रारी वाढतच आहेत. विद्यापीठ प्रशासनाने त्वरित गुगल फॉर्मद्वारे तक्रारी घ्याव्यात, त्याबाबत परिपत्रक काढण्यात यावेत. संपूर्ण तक्रारी थेट विद्यापीठाकडे येतील आणि अडचणी सोडवण्यासाठी कार्यवाही करण्यास सोपे जाईल,” असं कमलाकर शेटे, उपाध्याय युक्रांद पुणे शहर यांनी सांगितलं. स्टूडंट वेल्फेअर असोसिएशन अध्यक्ष वैभव एडके यांनी सुद्धा हीच मागणी केली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img