आज देशव्यापी संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनसह १० बँक कर्मचारी संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. करोनाच्या पार्श्वभूमीवर बँक कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेत आंदोलन केले. राज्यात या संपाला बँकिंग क्षेत्रातील चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेने केला आहे.
मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या देशव्यापी संपाला आज राज्यातील बँकिंग कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबई, पुणे, नाशिक या महानगरांव्यतिरिक्त जिल्हास्तरावर बँक कमर्चाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे आज एसबीआय वगळता इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवहार ठप्प झाले.


संपाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश बँकांनी एटीएम रोखीने सज्ज ठेवले होते. त्याशिवाय डिजिटल बँकिंग सेवेचा वापर करावा, असे आवाहन देखील ग्राहकांना करण्यात आले होते. मात्र तरीही काही ठिकाणी आज ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. काही शाखांमध्ये आज कर्मचाऱ्यांनी शटर देखील उघडले नाही. बँकिंग क्षेत्रातील सरकारची धोरणे, खासगीकरण याबाबत संपकऱ्यांनी घोषणाबाजी केली.