Avinash Bhosale आमदार प्रताप सरनाईक यांचे घर व कार्यालयांवर ईडीने छापे टाकल्याचे प्रकरण ताजे असतानाच प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याकडे आता ईडीने मोर्चा वळवला आहे.
मुंबई:विदेशी चलन प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात भोसले यांची आज सुमारे १० तास चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. सकाळी १० वाजता भोसले ईडी कार्यालयात पोहचले होते. त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास ते तिथून बाहेर पडले. त्यांनी माध्यमांकडे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तसेच ईडीनेही याबाबत अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही. ( Enforcement Directorate Interrogated Avinash Bhosale )

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने पुण्यात अविनाश भोसले यांच्या काही ठिकाणांवर छापे मारले होते. त्यानंतर ईडीने भोसले यांना चौकशीसाठी बोलावले होते आणि त्यानुसारच भोसले आज सकाळी मुंबईतील ईडी कार्यालयात पोहचल्याचे सांगण्यात येत आहे. विदेशी चलन प्रकरणात फेमा (FEMA) कायद्यांतर्गत भोसले यांची चौकशी करण्यात आली व त्यांच्याकडील कागदपत्रांचीही छाननी करण्यात आली, असे सूत्रांचे म्हणणे आहे