More
  HomeNationalMaharashtraCongress : महाआघाडी सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल? ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसची चक्क...

  Congress : महाआघाडी सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल? ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसची चक्क दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स?

  राज्यातील महत्त्वाचे काँग्रेसचे नेते सरकारमध्ये असतानाही काँग्रेसला महाराष्ट्राच्या प्रश्नावर दिल्लीत पत्रकार परिषद घ्यावी लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून या निमित्ताने महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. (why congress has taken pc in delhi on maharashtra related issue?)

  मुंबई: राज्यातील महत्त्वाचे काँग्रेसचे नेते सरकारमध्ये असतानाही काँग्रेसला महाराष्ट्राच्या प्रश्नावर दिल्लीत पत्रकार परिषद घ्यावी लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून या निमित्ताने महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. ठाकरे सरकारनं काँग्रेसला दुय्यम वागणूक देणं, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कलाने सरकार चालवणं, काँग्रेस आमदारांना निधी न मिळणं, किमान समान कार्यक्रमातील अनेक मुद्द्यांकडे ठाकरे सरकारचं झालेलं दुर्लक्ष आणि यूपीए चेअरमनपदासाठी शिवसेनेने पवारांच्या बाजूने बॅटिंग करणं आदी सर्व कारणांमुळे काँग्रेसला महाराष्ट्राच्या प्रश्नांवर दिल्लीत पत्रकार परिषद घ्यावी लागली असून त्यामागे दबावतंत्राचा भाग असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. त्यातील प्रत्येक मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा. (why congress has taken pc in delhi on maharashtra related issue?)

  दलित व्होट बँक मजबूत करण्यासाठी

  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देतानाच अनुसूचित जाती आणि जमातींच्या योजनांसाठी निधी दिला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या निधीचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसने दलितांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. पश्चिम बंगाल, पंजाब आणि नंतर उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही राज्यातील दलित व्होट बँक कायम ठेवण्यासाठी आणि दलितांमधील पक्षाची इमेज कायम राखण्यासाठीच काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवाय निधी मिळत नसल्याबाबत काँग्रेस आमदारांच्या तक्रारीही होत्या, काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीही केल्या होत्या, त्याकडेही लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसवर दिल्लीत पत्रकार परिषद घेण्याची वेळ आल्याचं सांगितलं जात आहे.

  किमान समान कार्यक्रमाची आठवण

  राज्यात कोरोनाचं संकट आल्याने सरकारचे नऊ महिने या संकटाचा सामना करण्यात गेले. त्यानंतर राज्य आता सावरत असताना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या मुद्द्यांना सरकारला प्राधान्य द्यावं लागत आहे. अशा वेळी आघाडीचा किमान समान कार्यक्रम अडगळीत पडल्यासारखं चित्रं आहे. राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढतानाच किमान समान कार्यक्रमही राबवला जावा, कल्याणकारी योजना राबविल्या जाव्यात, याची आठवण करून देण्यासाठीही काँग्रेसने कंबर कसल्याचं बोललं जात आहे. देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, या पार्श्वभूमीवर कोरोना संकटातही किमान समान कार्यक्रम राबवून दाखवल्याचं चित्रं काँग्रेसला उभं करायचं आहे, त्यासाठीही काँग्रेसची धडपड असल्याचं बोललं जात आहे.

  दबाव तंत्राचा भाग

  राज्यातील ठाकरे सरकार शरद पवार यांच्या कलाने चालत असल्याचं चित्रं आहे. काँग्रेसला गृहित धरून अनेक निर्णय होत आहेत. त्याबाबत राज्य काँग्रेसने अनेकदा नाराजीही बोलून दाखवली आहे. त्यामुळे काँग्रेसचा निर्णय प्रक्रियेत सहभाग व्हावा म्हणूनही काँग्रेसने दबावतंत्र सुरू केल्याचंही राजकीय निरीक्षकांना वाटत आहे.

  राहुल गांधींचं नेतृत्व मान्य व्हावं

  काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वावरून वाद सुरू आहे. पक्षातील नेतेच राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य करण्यास तयार नाहीत. इतर प्रादेशिक पक्षही राहुल यांचं नेतृत्व स्वीकारतील की नाही यात शंका आहे. त्यातच यूपीएचे चेअरमनपद शरद पवार यांच्याकडे जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यासाठी शिवसेनेने जोरदार बॅटिंगही केली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे सोनिया गांधी नाराज असल्याचं बोललं जात आहे. संपुआत काल आलेल्या शिवसेनेकडून पवार निष्ठा दाखवली जात असल्याने आगामी काळात यूपीएच्या चेअरमनपदावरून एनडीएत मोठा वाद निर्माण होऊ शकतो. हे पद राहुल गांधी यांना द्यायचे झाल्यास त्याला विरोध होऊ शकतो. त्यामुळे शिवसेनेसह सर्व घटक पक्षांनी राहुल गांधी यांचं नेतृत्व स्वीकारावं म्हणूनही काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेनेही यूपीए चेअरमनपदासाठी भविष्यात राहुल यांना पाठिंबा द्यावा म्हणून आतापासूनच शिवसेनेला वेसन घालण्याचा या पत्रकार परिषदेमागचा हेतू असल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

  बिहारमधील नुकसान भरून काढण्यासाठी

  बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शिवसेनेसोबत आघाडी केल्याचा फटका बसला आहे. शिवसेनेसोबत आघाडी केल्याने बिहारमध्ये ओबीसींनी काँग्रेसला मतदान केलं नाही. ओबीसींनी काँग्रेसऐवजी भाजपच्या पारड्यात मतदान टाकलं. त्यामुळे ओबीसींना परत आपल्याकडे आणण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. बिहारची पुनरावृत्ती पश्चिम बंगला, पंजाब आणि उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात होऊ नये म्हणून विरोधी विचाराच्या पक्षासोबत राहूनही विकासकामे करता येतात हे दाखवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे. (why congress has taken pc in delhi on maharashtra related issue?)

  संवाद निर्माण व्हावा म्हणून

  गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेनेत कम्युनिकेशन गॅप निर्माण झाला आहे. हा गॅप भरून काढण्यासाठीही काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहे. दोन्ही पक्षात संवाद कायम राहतानाच ठाकरे सरकारवर दबावही राहिला पाहिजे ही हायकमांडची खेली आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे सरकारवर काँग्रेसचाही दबाव राहणार असून सरकार चालवताना ठाकरे सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (why congress has taken pc in delhi on maharashtra related issue?)

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img